कामगिरी

[कामगिरी][bsummary]

शालेय उपक्रम

[शालेय उपक्रम][twocolumns]

गॅलरी

[गॅलरी][bigposts]

प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाची ओळख – विज्ञान कार्यशाळा

दिनांक १० मार्च २०२६ रोजी पीएम श्री जिल्हा परिषद शाळा, मानिवली, ता. कल्याण, जि. ठाणे (UDISE No.: 27210501401) येथे “प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाची ओळख” या शीर्षकाखाली विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत एकूण ५५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यशाळेसाठी श्री. हेमंत लागवणकर आणि सौ. प्रिया लागवणकर यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तज्ज्ञ मार्गदर्शकांचा थोडक्यात परिचय

श्री. हेमंत लागवणकर (M.Sc., B.Ed.) हे प्रसिद्ध विज्ञान प्रसारक व शैक्षणिक सल्लागार आहेत. विज्ञान विषयावर त्यांनी ४८ पुस्तके लिहिली असून विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमध्ये ११०० पेक्षा अधिक विज्ञानविषयक लेख प्रकाशित झाले आहेत. विज्ञान प्रसारातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारचा राष्ट्रीय विज्ञान प्रसार पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम विकास मंडळात सदस्य म्हणून तसेच विविध शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रकल्प प्रमुख म्हणून काम केले आहे.

सौ. प्रिया हेमंत लागवणकर (M.Sc.) या विज्ञान शिक्षण व विज्ञान प्रसार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी विज्ञान विषयावर अनेक पुस्तके लिहिली असून विविध वृत्तपत्रांमध्ये शंभरहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडसाठी त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात विषय समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

कार्यशाळेतील प्रयोग

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी खालील प्रयोग प्रत्यक्ष करून विज्ञानातील संकल्पना समजून घेतल्या:

  1. रेषीय गती व चक्राकार गती – हेलिकॉप्टर
  2. हवेचा दाब व गती
  3. जास्वंदीच्या फुलाचा छेद व त्याचे भाग
  4. लिटमस पेपर तयार करून आम्ल – अल्कारी ओळखणे
  5. ध्वनीचे वहन
  6. बुमरँग तयार करणे
  7. कॉईन बॅटरी
  8. कागदाचे फूल फुलवणे
  9. यीस्टच्या क्रियेमुळे फुगा फुगवणे
  10. कुंडीत फुल / पिंजऱ्यात पोपट
  11. मृत समुद्र प्रयोग
  12. रंगीत द्रव्यांचे पृथक्करण

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून विज्ञानातील संकल्पना अनुभवातून शिकल्या. प्रयोग करताना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि विज्ञान शिकताना खूप मजा व आनंद अनुभवला.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. प्रयोगांच्या माध्यमातून शिकण्याची ही संधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.

कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल श्री. हेमंत लागवणकर व सौ. प्रिया लागवणकर यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.



















No comments:

Post a Comment